पुणे - शहरात घरांच्या बाहेर, दुकानांच्या बाहेर लावलेल्या सूचना देणाऱ्या पाट्या आणि त्यावरील मजकूर नेहमीच लक्षवेधी असतो. 'पुणेरी पाट्या' म्हणून या पाट्या प्रसिद्ध देखील आहेत. कमी शब्दात जास्तीत-ज्यास्त मार्मिक टोले लगावण्यात प्रसिद्ध असलेल्या पाट्या हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता या पुणेरी पाट्यांमध्ये 'पुणेरी मेन्यू कार्ड'ची भर पडली आहे. हॉटेलमध्ये असलेल्या मेन्यू कार्डवर हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ आणि त्यांचे दर, अशी जुजबी माहिती असते. मात्र, पुण्यातील इराणी कॅफेच्या मेन्यू कार्डवर ग्राहकांनी काय करू नये, याबाबत सूचना दिल्या आहेत.
काय आहेत सूचना?
कॅफेमध्ये कंगवा वापरायचा नाही, दात घासायचे नाही, झोपायचे नाही, खुर्चीवर पाय ठेवायचे नाही, लॅपटॉप वापरायचा नाही, धूम्रपान करायचे नाही, कुठलेही क्रेडिट कार्ड चालणार नाही, टेबलाखाली चुईंगम लावायचे नाही, कॅफेत बसून मोबाईलवर गेम खेळायचे नाही, फूड कुपन्स चालणार नाहीत, कॅशियर बरोबर फ्लर्टिंग करायची नाही, अशा सूचनांची मोठी यादीच मेन्यू कार्डवर छापण्यात आली आहे.
साधारणपणे आपल्या कॅफेत ग्राहक यावे यासाठी व्यावसायिक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सवलती देतात. मात्र, बाणेरमधील या इराणी कॅफेची बातच काही वेगळी आहे. त्यांनी ग्राहकांसाठी केलेली नियमावलीतील काही मुद्दे योग्य आहेत तर काही आश्चर्यकारक आहे. शहराच्या विविध भागात शाखा असलेल्या इराणी कॅफेचे हे मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.