पुणे - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाणारे हुतात्मा शिवराम हरि-राजगुरु यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या खेड गावात झाला. राजगुरुंच्या बलिदानाची आठवण म्हणून या गावाला आता राजगुरुनगर हे नाव आहे. याच गावात भीमेच्या तीरावर असलेल्या क्रांतीकारकांच्या या वाड्याला मोठा इतिहास लाभला आहे. मात्र, त्यांच्या वाड्याचे स्मारक अजुनही दुर्लक्षितच राहिले आहे.
या वाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेकदा आराखडे बनविले. स्मारकाचा एक भव्य आराखडा तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचीही तरतूद केली. या वाड्याच्या विकासासाठी निधीही मंजूर केला. मात्र, सरकार आणि प्रशासनाची उदासिनता आणि उच्च समितीच्या बैठक न झाल्याने हे काम थांबून आहे. स्मारक होण्याची अजूनही प्रतिक्षाच आहे. या हुतात्म्याच्या स्मारकाची कोट्यवधी रुपयांची कागदावरील तरतुदी प्रत्यक्षात कधी येणार हे पहावे लागणार आहे.