पुणे - राज्य सरकार कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात कोणत्याही समन्वयाचा आभाव नसल्याचे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. पुण्यातील ससून रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. अमित देशमुख यांनी पुण्यातील बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला. तसेच पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा वेळेवर
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा या वेळेवर होतील, असेही यावेळी अमित देशमुख म्हणाले. येत्या 2 दिवसात परिक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. 15 जूलैपासून परिक्षांचे वेळापत्रक सुरु होईल. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, लॉकडाऊनची स्थिती आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही देशमुख म्हणाले.
सध्या राज्यात जो इतर विभागांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तो कदाचित करता येत असावा, म्हणून घेतला असेल. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाचे विद्यापीठ वेगळे आहे. केंद्रीय परिषदा वेगळ्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाची परिक्षा वेळेवर होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्वांचे अमित देशमुख यांनी आभार मानले. कोविड 19 विरोधातला लढा हा रुग्णालयात नाही तर रुग्णालयाबाहेर आहे. याचा प्रसार कमी कसा होईल. त्यादृष्टीने आपल्याला पाऊले उचलायची आहेत. कोविड 19 च्या प्रत्येक रुग्णाला चांगले उपचार कसे मिळतील याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
कोविड 19 चे रुग्ण कमी होत आहेत
कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे देशमुख म्हणाले. कोविड 19 पूर्वी महाराष्ट्रात फक्त 4 लॅब होत्या. आज त्याची संख्या 80 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 5 लाखांच्यावर टेस्टिंग झाल्या असून, हा आकडा सर्वाधिक असल्याचे देशमुख म्हणाले.