पुणे - व्हॅलेंनटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ७ फेब्रुवारीपासून या आठवड्याला सुरुवात देखील झाली आहे. या काळात मावळच्या गुलाबाची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांमध्ये जवळपास ८० लाख रुपयांचे उत्पन्न होईल, असा अंदाज गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील मावळ परिसर गुलाबाची शेती करण्यासाठी ओळखला जातो. याचठिकाणी मुकुंद ठाकर आणि तानाजी दामू शेंडगे यांच्यासह काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी गुलाब शेती करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी पवना फुल उत्पादक संघाच्या माध्यमातून सामूहिक गुलाब शेती साकारली आहे. त्यांच्या वीस एकर शेतात तब्बल चार कोटी रुपयांची उलाढाल होते. शिवाय व्हॅलेंनटाईन डे च्या अवघ्या दहा दिवसांमध्ये ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, असे शेतकरी सांगतात. ठाकर यांच्या शेतात लागवड केलेला गुलाब हा गुलाबी, लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे. व्हॅलेंनटाईन डेच्या काही दिवस अगोदर ही फुले काढून थेट परदेशी बाजारात पाठवली जातात. लाल रंगाच्या गुलाबाला व्हॅलेंनटाईन डेला विशेष मागणी असते. मावळमधील गुलाबाची फुले ही जपान, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया या देशात जातात. यंदा देखील तब्बल ७ लाख गुलाबाची फुले परदेशात पाठवण्यात आली आहेत.
तानाजी दामू शेंडगे हे म्हणाले की, २० एकर गुलाबाची शेती करत आहोत. ७ लाख गुलाबाची फुले एकट्या पवना फुल उत्पादक संघातून जातात. एक एकरामध्ये किमान ६० हजार फुले मिळणे अपेक्षित असते. या माध्यमातून वार्षिक चार कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले जाते.
शेतकरी मुकुंद ठाकर म्हणाले, यावर्षी पाऊस जास्त असल्याने थंडी जास्त पडेल असे वाटले होते. मात्र, थंडी कमी झाली. त्यामुळे कमी दिवसात फुलांचे उत्पादन सुरू झाले. शेतकऱ्यांचा अंदाज चुकला. परदेशी बाजारामध्ये मागणी सुरू होण्याच्या अगोदरच गुलाबाची फुले उमलायला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा घेता आलेला नाही. खरेतर यावर्षी अवघ्या महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला. तरीही बळीराजाला संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा पद्धतीची शेती करून बळीराजा हा सुगीचे दिवस आणू शकतो, असेही ते म्हणाले.