पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ( Santshrestha Dnyaneshwar Mauli ) 726वा संजीवन समाधी सोहळा ( Sanjivan Samadhi Ceremony ) मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी तीर गर्दीने फुलून गेला आहे. निर्बंधमुक्त हा सोहळा पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये देखील आनंदाच वातावरण आहे.
किर्तनाने ह्या सोहळ्याला सुरुवात : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा निर्बंधामुक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित होत होता. मात्र, यावर्षी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. किर्तनाने ह्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ठीक बाराच्या सुमारास कीर्तन झाल्यानंतर संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी होऊन या सोहळ्याची सांगता होईल. अशी माहिती देवस्थान चे विश्वस्त विनायक ढगे ह्यांनी दिली आहे.
आळंदीत चार लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल : कोरोना संकटातून माउलींनी सुखरूप बाहेर काढले आणि ह्या सोहळ्याला येण्याच भाग्य लाभले असे मत वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांनी माऊलींकडे साकडे घातले असून शेतकऱ्याला सुगीचे दिसव येऊ दे अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आळंदीत चार लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल झाले आहेत. सोहळा संपातच वारकरी परतीच्या मार्गाने आपापल्या गावी निघतील.