पुणे- भुसार बाजारामध्ये जोपर्यंत व्यापारी अथवा दुकानदार तोलाई कामगारांना कामावर घेणार नाहीत तोपर्यंत पुण्यातील मार्केटमध्ये काम बंद ठेवण्याचा निर्णय हमालांनी सोमवारी घेतला आहे. कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पणन मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यातील माथाडी हमाल कामगार कायद्याच्या अंमलबजावणीतील अनागोंदी आणि मनमानी तात्काळ थांबवून कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. कामगार, सहकार, पणन, उद्योग, पुरवठा या विभागात परस्पर समन्वय साधण्यात यावा. कोणालाही माथाडी कायद्यातून वगळण्याची मुभा देण्यात येऊ नये. स्थानिक माथाडी मंडळ आणि राज्य सल्लागार मंडळावर कामगारांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य हमाल मापाडी महामंडळ, हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पो पंचायत, पथारी पंचायत, मोलकरीण संघटना अशा विविध संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.