पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मास्क घाला, सॅनिटाझरने हात धुवा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अचानक मागणी वाढल्याने दुकानदारांनी अवैधरित्या साठा केला. प्रशासनाने याबाबत कारवाई करीत साठा जप्त केला. सरकारचा जप्त केलेला साठा वापरात आणण्यासाठी खुला करावा याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा- CORONAVIRUS : देशात 1 हजार 694 कोरोनाग्रस्तांचा बळी..बाधितांचा आकडा 50 हजाराच्या उंबरठ्यावर
या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. कोलाबावाला यांच्या न्यायालयात सोमवारी व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. मोहन जोशी यांच्या वतीने अॅड. हर्ष पार्टे हे न्यायालयीन काम पहात असून त्यांचे कौन्सिल अॅड. विशाल कानडे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, सॅनिटायझर, मास्क आदी वैद्यकीय सहित्याचा तुटवडा कोरोना संसर्गावर उपचार करताना डॉक्टर्सना जाणवत आहे. कोरोनाचा जास्त उद्रेक महाराष्ट्रात झाल्याचे केंद्र सरकारनेही मान्य केले आहे. दरम्यानच्या काळात या पूर्वीच राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य खाते आणि अन्य खात्यांनी या साहित्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पीपीई कीट्स, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासह ठिकठिकाणी छापे टाकून जप्त केले. जप्त केलेले ते साहित्य वापरात आणण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने डॉक्टरांनाही रुग्णांवर उपचार करताना या साहित्याची गरज आहे. त्यामुळे हे साहित्य वापरात आणण्यासाठी खुले करावे. पोलीस खात्याने जप्त केलेले पीपीई कीट्स, मास्क, सॅनिटायझर तातडीने वैद्यकीय वापरात आणण्याबाबत सध्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. तरी, जनहित लक्षात घेऊन न्यायालयानेच याबाबत निर्देश द्यावेत आणि या साहित्याचा वापर रुग्णालये आणि डॉक्टर्स यांना तातडीने करता यावा.