पुणे - ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी पुण्यात महात्मा फुले समता परिषद आणि विविध संघटनांनी एकत्र येऊन शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण देत आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यंच्यासह आंदोलकांची धरपकड केली. सर्व आंदोलकांना फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले होते.
सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने आंदोलकांनी शनिवारवाडा परिसरात एकत्र येण्यास सुरुवात केली होती. उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, जय ज्योती जय संविधान, यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना अडवले. परंतु, आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे, पोलिसांनी समीर भुजबळ, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनामुळे शनिवारवाडा परिसरात वाहतुकीची कोंडी
या आंदोलनामुळे शनिवारवाडा परिसरात काही काळ गोंधळ निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. आंदोलनादरम्यान, ओबीसीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आज ठिक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातही आंदोलन होणार होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा काढणार होतो. परंतु, पोलिसांनी ऐनवेळी मोर्चाला परवानगी नाकारली. मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात आम्ही कधीच नव्हतो. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ म्हणाले.
हेही वाचा - प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा दीराच्या मदतीने पत्नीने केला खून