पुणे - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आक्रोश मोर्चा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिरूर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांच्या निवासस्थानावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. याबाबत निवेदनही दिले.
निवेदन हे कागद नसून या मराठा समाजाच्या भावना आहेत. या भावनांचा आदर करून राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पवार यांनी आंदोलकांना सांगितले. तर, मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण असून, शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
तसेच, मागील सरकारच्या काळात मराठा समाजाने राज्यभरात अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमध्ये आताचे आमदार व त्यांचे परिवार सहभागी होते. त्यावेळी मराठ्यांचे आरक्षण हे हक्काचे आरक्षण असल्याचे प्रत्यकाने ठोकपणे सांगितले होते. मात्र, आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा मंत्री, आमदार, खासदार यांच्या निवासस्थानांबाहेर आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
हेही वाचा- वाफ घेतल्याने कोरोना होत नसल्याची अफवा; उकळते पाणी सांडल्याने दोन चिमुरडे भाजले