पुणे - महावितरण कंपनीमार्फत उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या अनुषंगाने 1 आणि 2 डिसेंबरला महावितरण कार्यालयामार्फत उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी महावितरण कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. मात्र, या कागदपत्र पडताळणीमधून मराठा समाजातील एस.ई.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. 2 डिसेंबर) राज्य भर महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.
एस.ई.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांची तत्काळ भरती करावी अन्यथा तीव्र आंदोलन
मंत्री नितीन राऊत यांनी महावितरण एस.ई.बी.सी. प्रवर्गातील मराठा उमेदवारांना नियुक्ती देणार असल्याचे सांगितले होते. मराठा तरुणांवर महावितरण अन्याय करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. तरीही मराठा उमेदवारांना डावलण्यात येत आहे. महावितरणच्या उपरोक्त कृतीचा मराठा समाज जाहीर निषेध करत असून ती चूक तत्काळ सुधारण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला.
एखाद्या मराठा तरुणाने आत्महत्या केली तर याला सरकार जबाबदार
मराठा समाजातील मुलांना भरती प्रक्रियेतून डावलून एक प्रकारे महावितरणाने मराठा समाजाची अवहेलना केली आहे. या विरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे. भविष्यात जर एखाद्या मराठा तरुणाने आत्महत्या केली तर याला सर्वस्व सरकार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा - चंदनाची तस्करी : मुद्देमालासह एकजण जेरबंद
हेही वाचा - वीजवितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचा दरवाजा चोरताना महिला सीसीटीव्हीत कैद