पुणे - मराठा समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला बंद करण्याचा घाट घातला जात आहे. तसेच या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप मराठा समाज संघटनांनी केला आहे. म्हणून याविरोधात शनिवारी मराठा संघटनांकडून येथील सारथी संस्थेच्या बाहेर 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. उपोषण आंदोलनात खासदार छत्रपती संभाजीराजे, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सहभागी होणार आहेत.
मराठा क्रांती मूक मोर्चा सकल मराठा समाज तसेच मराठा समाजातील विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या. खासदार संभाजी राजे यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती. त्याला साथ देत मोठ्या संख्येने कायकर्ते या उपोषणासाठी उपस्थित आहेत. यावेळी संस्थेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पुण्यात बैठक देखील घेण्यात आली. सरकारने मराठा समाजाची भूमिका तातडीने समजून घ्यावी, सारथी संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थेवर सातत्याने अन्याय करणाऱ्या सचिव जे. पी. गुप्ता यांचे निलंबन करावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा - शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..