पुणे - मोठा गाजावाजा करत तब्बल 80 ते 90 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये अनेक त्रुटी असल्याचे खुद्द पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कबूल केले. हे जम्बो रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर त्याच्यात अनेक दोष असल्याचे उघडकीस आले. रुग्णालयाविषयी आतापर्यंत जे काही झाले ते चुकीचे झाले, हे मान्यच करायला पाहिजे. येथून पुढे रुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरू राहिले पाहिजे, येथे येणाऱ्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळाले पाहिजेत. यादृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही महापौर म्हणाले.
पुण्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाला मात्र यावर नियंत्रण मिळवताना नाकी नऊ येत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे प्रशासनावर चहूबाजूने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनंतर महापौर पत्रकारांशी बोलत होते.
जम्बो हॉस्पिटलच्या अपयशाची जबाबदारी पीएमआरडीची
जम्बो रुग्णालय उभारताना निविदाप्रक्रियेपासून इतर सर्व प्रक्रिया या 'पीएमआरडीए'च्या देखरेखीखालीच राबवल्या गेल्या. या रुग्णालयच्या आत काम करणाऱ्या एजन्सीही त्यांनीच नेमल्या आहेत. त्या एजन्सीज काम करत नाहीत तर ही जबाबदारीही त्यांचीच आहे. नेमलेल्या एजन्सींकडून काम करून घेणे ही जबाबदारी पीएमआरडीएचीच आहे. त्यामुळे जम्बो रुग्णालयामध्ये जो काही चुकीचा प्रकार सुरू आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी पीएमआरडीएची आहे. पीएमआरडीने काम न करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी महापौरांनी या बैठकीत केली.
800 बेड जाहीर केले असतानाही फक्त 330 बेड उपलब्ध
जम्बो हॉस्पिटल तयार होत असताना जे काही सांगण्यात आले होते, त्यातील एका गोष्टीचेही त्याठिकाणी पालन होत नाही. या रुग्णालयाविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची परिस्थिती काय आहे, याची माहितीही नातेवाईकांना मिळत नाही. रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरच नातेवाईकांना त्याची माहिती दिली जाते. याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. हे रुग्णालय तयार होत असताना याठिकाणी 600 ऑक्सिजन आणि 200 व्हेंटिलेटर बेड असतील, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात 300 ऑक्सिजन आणि फक्त 30 व्हेंटिलेटर बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सर्व घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
कोरोना हाताबाहेर गेलाच नाही
पुण्यातील कोविड-19 रुग्णांचा आकडा जरी एक लाखावर गेला असला तरी यातून बरे होण्याची संख्याही 82 टक्के इतकी आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण 15 हजार असले तरी यातील गंभीर रुग्णांची संख्या 800 ते 850 इतकीच आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली असे नाही. कोविड-19 च्या रुग्णाला योग्यवेळी योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे आणि ते मिळवून देण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.