पुणे- खेड तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून आता त्यात आखाडपार्ट्यांची भर पडली आहे. गेल्या चार दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 200 पार गेला असून आखाडी पार्ट्यांमुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. यामध्ये उद्योजक, राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे.
राजगुरुनगर, चाकण, आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला असून 844 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 14 जणांचा मृत्यू झाला असून 386 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच पोलीस अधिकारी व प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण जबाबदारी महिला तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या खांद्यावर आली आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, गर्दी टाळणे अशा विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.
राजगुरुनगर शहरात आखाडपार्ट्यांनी रंग धरला होता. या पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणातील उद्योजक, राजकीय मंडळी सहभागी झाले होते. यामधील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राजगुरुनगर शहर परिसरात झालेल्या आखाडपार्ट्या अनेकांना भोवल्या आहेत.
खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला असून रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा चिंत्तेचा विषय बनला असून ग्रामीण भागातील कोरोनाची वेळीच साखळी तोडण्याची गरज आहे.