पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. तसेच, आंबे खाण्याची सुरूवातही याच दिवसापासून करतात. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य ठेवण्यात आला आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवताली सर्व दिशांना हापूस आंबे ठेवण्यात आले आहेत.
अक्षय तृतीयेच्या दिवशी फळांचा राजा आंब्याला विशेष महत्व असते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. या मुहूर्तावर आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक वर्षे ही परंपरा कायम आहे.
आज दिवसभर दगडूशेठ गणपती मंदिरात विबिध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ४ ते सकाळी ६ पर्यंत प्रख्यात गायक अजित कडकडे यांनी स्वराभिषेकातून गणरायासमोर गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग पार पडला. रात्री ९ वाजता अखिल भारतीय महिला वारकरी भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन होणार आहे.
हा आंब्याचा प्रसाद दुस-या दिवशी म्हणजेच बुधवारी ससूनमधील रुग्णांना आणि गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू यांच्यावतीने हा आंब्याचा नैवेद्य बाप्पासमोर ठेवला जातो. यावर्षी सोमवारी (६ मे) रात्री हे ११ हजार आंबे दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यास सुरवात झाली होती.