पुणे - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंचर कृषी उत्पन्नबाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतीमाल खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प होते. आठ दिवसानंतर बाजार समिती सुरू होणार होती. मात्र, आता पुन्हा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाच लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, शेतकऱ्यांना आणखी आर्थिक तोटा सहन करावा लागू नये म्हणून मंचर बाजार समिती सुरू केली जाणार आहे.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, व्यापारी व शेतकरी यांनाच प्रवेश देणे, अशा नियमांचे काटेकोर पालन करूनच मंचर बाजार समिती शेतकऱयांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंचर बाजार समितीतील व्यापारी, आडते आणि शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांच्या बंदमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वच बाजारपेठा पुन्हा बंद होऊन छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक नागरिकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱयांच्या अडचणी लक्षात घेऊन नियमावलींच्या अधीन राहून पुन्हा मंचर बाजार समिती सुरू करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.