माळीण (पुणे) - रायगड जिल्ह्यातील तळीये गावात माळीणची पुनरावृत्ती झाली आणि तब्बल 84 जणांनी आपले प्राण या भूस्खलनातील दुर्घटनेत गमावले. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. याबाबत माळीण येथील नागरिकांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले की, अशा दुर्घटना होऊच नयेत यासाठी डोंगरकपारीत राहणाऱ्या लोकांचे योग्य जागी पुनर्वसन केले पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्याची मागणी माळीणवासीयांनी केली आहे.
तळीयेने त्या काळ्या दिवसाची आठवण करून दिली -
३० जुलै २०१४ रोजी देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण माळीण गाव जमीनदोस्त झाले. सरकारने उर्वरित नागरिकांची घरे बांधून दिली. त्याचबरोबर आर्थिक मदत देखील केली मात्र बांधून दिलेल्या घराच्या चार भिंतीमध्ये वास्तव्यास गुण्यागोविंदाने नांदणारे कुटुंब उरले नाही. सात वर्षांपूर्वी माळीणच्या या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांना आपले प्राण गमवावे लागले. नेस्तनाबूत झालेल्या माळीण गावाचे शासनाने नवीन जागेवर पुनर्वसन केले. प्राण गमावलेल्या १५१ नागरिकांची नावे कोरून 'स्मृतिस्तंभ' उभारले, एवढंच काय तर याच नागरिकांच्या नावे प्रत्येकी एक झाड लावून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला आहे. मात्र आजही त्या सात वर्षांपूर्वीच्या उजाडलेल्या काळ्या दिवसाची आठवण काढून उर्वरित नागरिक आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत.
नागरिकांनी केली विनंती -
नुकत्याच रायगड जिल्ह्यातील तळीये गावात घडलेल्या दुर्घटनेच्या बातम्या ऐकून माळीण गावचे नागरिक शासनाकडे विनंती करत आहेत की जी वेळ आमच्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ देऊ नका डोंगराच्या पायथ्याशी धोकादायक परिस्थितीत असलेल्या गावांचे वेळीच पुनर्वसन करा अन्यथा माळीण आणि तळीये गावाची दुर्दशा झाली त्या सारखी अनेक गावांची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही.
पर्यटकांनी भान राखणे गरजेचे -
माळीण येथील स्मृती स्थळावर अनेक लोक भेट देण्यासाठी येतात आणि जेव्हा स्मृती स्थळावर धांगडधिंगा घालत सेल्फी काढतात त्यावेळी मनामध्ये खूप दुःख होत असल्याची भावना दुर्घटना ग्रस्त नागरिक व्यक्त करतात. गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने पुन्हा पुन्हा तीच आठवण करून दिली की ती काळी पहाट डोळ्यासमोरून जात नाही आणि काळजाचा ठोका चुकतो की काय अस वाटते.