पुणे - मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली. पुण्याच्या चंदन नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. चंदन जयप्रकाश सिंग (वय ३६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी या प्रकरणी टिपू सुलतान फिरोज मंसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मृत चंदन सिंग याचा भाऊ राहुल जयप्रकाश सिंग (वय २९) यांनी याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन सिंग हा रविवारी सायंकाळी खराडी येथील एम्पायर हॉटेलसमोर मैत्रिणीसह थांबला होता. यावेळी आरोपी टिपू सुलतान आणि अनिरुद्ध राठोड हे त्या ठिकाणी आले आणि ते चंदनाच्या मैत्रिणीकडे एकटक पाहत होते. याचा राग आल्याने चंदन सिंग याने माझ्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहता? असे आरोपींना विचारले. यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करत खाली पाडले तर अनिल राठोड याने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही फरार झाले.