पुणे - महाविकास आघाडी सरकार हे कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असून पीपीई किट, मृतदेहाला लागणारी बॅग, तात्पुरते कोविड सेंटर याद्वारे भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज मावळ परिसरात भाजपच्या वतीने दूध दरवाढ आंदोलनात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचा महामारीत सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही जेवढे केले ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केले नसल्याचे सागंत, भाजपने 2 कोटी 88 लाख नागरिकांना जेवण दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोनासाठी आम्ही जेवढे करत आहोत तेवढे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससुद्धा करत नाही आहे. आम्ही 40 लाख लोकांना किरणाचे पॅकेट्स दिले. नागरिकांची स्क्रिनिंग आम्हीच करत आहोत. हिंजवडीत 104 बेडचे कोविड सेंटर सुरु केल्याचेही त्यांनी सांगते. मात्र, पण कोरोनाकडे लक्ष देत असताना महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचार करत आहेत असे ते म्हणाले. 19 हजार कोटी जीएसटी मधून सरकारकडे आलेत, मात्र तुम्ही एक रुपयांचे पॅकेजही सामान्य नागरिकांना दिले नाही. हे सरकार कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहे. मृतदेहासाठी लागणाऱ्या बॅग, तात्पुरती कोविड सेंटर, पीपीई किट घेण्यात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. तसेच, धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळत असून ब्रँडेड पीपीई किट साडेचारशे असून तेराशे रुपयांना विकत घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
हेही वाचा - अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलताना ते म्हणाले, सध्या सरकारकडून शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकहिताचे निर्णय न घेता सर्वसामान्यांना त्रास होईल, असे निर्णय ते घेत आहे असेही ते म्हणाले. खते, बी-बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. त्यांना खते मिळत नाहीत, हे सरकार शेतकऱ्यांना बांधावर खत बी बियाणे देणार होते? त्यांनी दिलेल्या या आश्वासनांचे काय झाले? दिवसभर रांगेत उभे राहिल्यानतंर शेतकऱ्यांना एक खताचे पोते मिळत आहे. अशा अनेक प्रकारच्या अडचणी सध्या शेतकऱ्यांपुढे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात हे सरकार अपयशी झाल्याची टिका त्यांनी केली. काय शेतकऱ्यांना मारून टाकायचे आहे असे या सरकारने ठरविले आहे. जगातील काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, जगात एवढी लोकसंख्या नको त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचा विचार करता इथला शेतकरी मारून टाकायचा का? असेही ते यावेळी सरकारबद्दल बोलताना म्हणाले.