पुणे Mahatma Phule National Memorial : महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक बांधण्यासाठी महापालिकेनं भाडेकरू आणि जागा मालकांना नोटीस बजावली होती. मात्र भाडेकरू आणि जागा मालकांनी जागा देण्यास नकार दिल्यानं वाद निर्माण झाला होता. या भाडेकरू आणि जागा मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं हे स्मारक करण्यासाठी मान्यता दिल्यानं स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. जीर्ण झालेली भिडेवाड्याची इमारत महापालिकेनं मंगळवारी मध्यरात्री उद्ध्वस्त केली.
भिडे वाड्यात होणार महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं स्मारक : महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा 1948 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली होती. त्यामुळे भिडे वाड्याला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे. मात्र आता भिडे वाडा जीर्ण झाला असून तो मोडकळीस आला आहे. त्यामुळे सरकारनं भिडे वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करण्याचं प्रस्तावित केलं आहे.
जागा देण्यास भाडेकरू आणि जागा मालकांचा विरोध : भिडे वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक करण्याचं महापालिकेनं प्रस्तावित केलं. मात्र भिडे वाड्याची जागा महात्मा फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाला देण्यास तिथल्या नागरिकांनी विरोध केला आहे. भिडे वाड्यातील भाडेकरू आणि जागा मालकांनी महापालिकेच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांच्या स्मारकाचं काम रखडलं होतं. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला १३ वर्षे उच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला. ८० सुनावण्यांमध्ये भक्कमपणानं बाजू मांडून याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा भरली होती, हे न्यायालयात सिद्ध करुन दाखवण्यात आलं.
न्यायालयाच्या आदेशानंतर भिडे वाड्यातील इमारत पाडली : मुली आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्यात बांधण्याचा मार्ग न्यायालयानं मोकळा केला होता. त्यामुळे महापालिकेनं भिडे वाड्यातील जीर्ण बांधकाम पाडलं आहे. दुकान मालकांना जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतरही दुकानं रिकामी करण्यात आली नसल्यानं महापालिकेनं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करुन ही कारवाई केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे जीर्ण वाड्याचं बांधकाम पाडण्यात आलं आहे. त्या ठिकाणी भव्य राष्ट्रीय स्मारक करणार येणार आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर दुकान मालक आणि भाडेकरू जागा खाली करण्यास तयार नसल्यानं महापालिका अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताची मागणी करणारं पत्र दिलं होतं. त्यामुळे भिडे वाडा परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती झोन एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे.
हेही वाचा :