पुणे - काही दिवस विश्रांती घेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच शेअर झोन सध्या दक्षिणेकडे झुकलेला आहे. त्यामुळे राज्यातील दक्षिण भागात पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागात येत्या 22 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाचे कमबॅक - हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात येत्या 22 तारखेपर्यंत पाऊस पडणार हे आता निश्चित झाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात बरसणार - मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात पावसाने दडी मारली होती. मात्र, आता मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अन्य भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कुठे किती पाऊस झाला - सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये 52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, तर 136 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के तर 109 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. 58 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
कुठे किती पेरणी झाली - खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. आजपर्यंत 88.44 लाख हेक्टरवर (62 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी 83 टक्के पेरणी झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत. राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत 100 टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध 48.34 लाख मे. टन खतापैकी 21.31लाख मे. टन खतांची विक्री झाली असून 27.03 लाख मे. टन खत उपलब्ध आहे.
हेही वाचा - Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचा जोर; कुठे किती पाऊस पडला? वाचा आकडेवारी