पुणे: सोमवारी तर राज्यातील अनेक भागात दुपार नंतर गारपीट आणि पावसाने अक्षरशः झोडपून टाकल होते. पुणे शहरात तर रात्रीच्या सुमारास अनेक भागात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. 5 ते 7 मार्च या कालावधीत राज्यातील अहमदनगर, संभाजी नगर भागांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये हवामान ढगाळ राहून काही भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गारा पडण्याची शक्यता: राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 8 मार्च नंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनासह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
गोवऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली: देशात आज सर्वत्र होळीचा सण उत्साह साजरा केला जात आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये अचानक पडलेला बेमोसमी पावसामुळे होळीला लागणाऱ्या गोवऱ्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. होळीनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातून शेकडो शेतकरी गोवऱ्या घेऊन नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी दाखल होतात. मध्यरात्री 2 वाजता अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आदिवासी भागातील गोवऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली. नाशिक शहरातील पंचवटी, गंगापूर रोड, सिडको, नाशिक रोड भागातील रस्त्याच्या कडेला गोवऱ्या विक्रीसाठी जिल्ह्यातील आदिवासी भागातून नागरिक आले आहेत. मात्र मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या गोवऱ्या भिजून गेल्यानंतर मोठे नुकसान झाले आहे.
1 रुपयाला गोवरीची विक्री: चार पाच दिवस आधी हे शेतकरी महिनो महिने साठवलेल्या गोवऱ्या घेऊन बाजारात विक्रीसाठी येत असतात. मात्र काल रात्री अचानक बेमोसमी पावसामुळे हजारो गोवऱ्या या पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे एरवी चार ते पाच रुपयांना विकली जाणारी गोवरी आता ग्राहक 1 रुपयांना मागत असल्याने वाहतुकीचा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याचे गोवऱ्या विक्रेते सांगत आहे. रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने काही गोवऱ्या पावसाच्या पाण्यात वाहून सुद्धा गेल्या आहे. त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने होळीच्या सणवार देखील पावसाचे सावट आले आहे. परीणामी अवकाळी पावसाचा फटाका गोवऱ्या विक्रेत्यांना बसला आहे.
कष्टावर पाणी पडले: गोवऱ्या विक्रेते सांगतात दिवाळीपासून गोवऱ्या बनवण्यास सुरुवात करतात. हे आमच्यासाठी एक पीकच आहे. होळीच्या तीन, चार दिवस आधी आम्ही नाशिक शहरात येतो. रस्त्याच्या कडेला गवऱ्या विक्री साठी ठेवतो,यातून मिळणारे उत्पन्न यातून आमचा गाडा चालतो. परंतु अवकाळी पावसामुळे आमच्या सगळ्या गवऱ्या भिजून गेल्या आहेत. त्यामुळे ग्राहक सुद्धा येत नाही. आता काय करावे असा प्रश्न आमच्या समोर पडला असे आदिवासी भागातून आलेल्या गवऱ्या विक्रेत्यांनी सांगितलं
खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी: बुलढाणा येथे खासगी बाजारात हरभरा उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदीकेंद्राकडे वळत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ७५ खरेदी केंद्र होती तर यावर्षी केवळ २४ खरेदी केंद्र चालू आहे. सदर खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनाही खरेदीस परवानगी द्यावी, तसेच नोदंणीसही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाफेडचे केवळ २४ केंद्रच सुरु: रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या प्रतिनिधींसह ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांची भेट घेतली. हरभरा खरेदी केंद्रांमध्ये वाढ करावी, या मागणीसह पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व बँकांच्या सक्तीच्या वसुलीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात हरबऱ्याचा पेरा मोठा आहे. परंतु हरबरा खरेदीसाठी नाफेडचे केवळ २४ केंद्रच सुरु आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ७५ खरेंदी केंद्र होते. त्यामुळे खरेदी केंद्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. आपल्या मालाची नोंदणी करण्यासाठी एका शेतकऱ्यांला कमीत कमी २० मिनिटे वेळ लागत असल्याने फार कमी शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे. त्यामुळे तातडीने खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, तसेच उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे ऑफलाईन पद्धतीने नोंदणीसाठी कागदपत्रे जमा केली आहे. त्यांनाही खरेदीसाठी तातडीने परवानगी देण्यात यावी व नोंदणीसाठी १५ मार्च पर्यंत असलेल्या मुदतीत वाढ मिळावी, अशी मागणी तुपकरांनी केली आहे.
पिकविमा अद्यापही बाकी: पिकविमा कंपनीकडे बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत मंजूर असलेल्या २५ ते ३० हजार शेतकऱ्यांचा व नामंजूर असलेल्या २६ हजार ७१९ शेतकऱ्यांचा पिकविमा अद्यापही बाकी आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करण्यात यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांना पिकविम्याची अत्यल्प रक्कम मिळाली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मानजनक वाढीव मोबदला जमा करावा, अशीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जर येत्या १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.