पुणे Chandrashekhar bawankule on Milind Deora : पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिरामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 'हर मंदिर स्वच्छता' अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला मंदिरांची स्वच्छता कराण्याचे आवाहन केले. जनतेकडूनदेखील यात मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शविला जात आहे. तसंच 22 जानेवारीपर्यंत हर मंदिर स्वच्छ अभियान हे सुरू राहणार आहे. हे अभियान देशव्यापी होणार आहे. हे अभियान फोटो सेशनसाठी नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर केली खरमरीत टीका : इंडिया आघाडीसंदर्भात विचारण्यात आलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस पक्षानं नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केलाय. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण काँग्रेससह सर्व पक्षांना निमंत्रण दिलंय. पण त्या निमंत्रणावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला. त्यामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काम हिंदू सनातन धर्माविरोधात भूमिका मांडणं हेच आहे. तसंच सत्तेत आल्यावर हिंदू धर्म संपवून टाकू, अशी भूमिका तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मांडली. त्यामुळं इंडिया आघाडी सोबत असलेले उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवणार्यांना मत देण्यासारखंच आहे. आता उद्धव ठाकरेंनी कितीही हिंदुत्वाच्या बाता मारल्या, तरी काँग्रेसच्या आणि इटालियन शक्तिच्या पायावर उद्धव ठाकरे हे लोटांगण घालत आहेत."
मिलिंद देवरा पक्षप्रवेशावरही दिली प्रतिक्रिया : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज (14 जानेवारी) सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे पक्ष प्रवेशाकरिता लोक रांगा लावत आहेत. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राला हादरे देणारे पक्ष प्रवेश दिसतील, असा दावाही त्यांनी केली. पुढे म्हणाले," आमचे टार्गेट कोणी नाही. मोदींच्या नेतृत्वात भारत महासत्ता होणार हे चीनने पण कबूल केलं आहे. जे मोदींना साथ देतील, त्यांना आम्हीही साथ देऊ असंही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -