पुणे- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. खासदार सुळे या अजित पवार यांच्यामुळे जिंकून आल्याचं चाकणकर यांनी वक्तव्य केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, की निवडून येणाऱ्या माणसालाही माहित आहे. कोण कोणामुळे निवडून आले, हे निवडून आणणाऱ्यादेखील माहीत आहे. उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
देशभरासह राज्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आरोग्य विभागाच्या वतीनं दरोरोज माहिती घेण्यात येत आहे. राज्यात कोविड वाढू नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होतं. आताच्या कोविडमध्ये ( JN 1 covid) फार तीव्रता नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. पण आम्ही मास्क वापरला पाहिजे, ते सत्य आहे, असं यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे. त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करत नाही. त्याच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. तसंच शिंदे समितीच्या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे आम्हाला चांगले ज्ञात आहे-अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार
तुमच्या पोटात का दुखतयं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 14 मतदार संघाचा दौरा करणार आहेत. माझ्याकडे 8 महिने शिल्लक राहिले, असे विधान मुख्यमंत्री यांनी केले आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना काय सांगावं, हे त्यांनी सांगितलं. तुमच्या पोटात का दुखतयं ? बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. माणूस बोलून जातो त्यात वाईट वाटण्याची गरज नाही, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
आलतू-फालतू प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहार करायचे असे विधान केले होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, नो कॉमेंट्स. कशाला खपल्या उखरुन काढायच्या? प्रांत अध्यक्ष यांनी उत्तर दिलं आहे. आज मी सकाळी 6 पासून कामाला सुरुवात केली आहे. मी आलतू-फालतू प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. ज्याला अर्थ नाही, त्याबाबत मी बोलणार नाही. 100 व्या नाट्य संमेलनच्या आजच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवार यांचं नाव टाकण्यात आलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझं नाव कुठेही टाकलेलं असतं.
अजित पवारांची शरद पवारांवर टीका- दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात गुरुवारी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. 80 वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं, असं म्हणत पुन्हा एकदा शरद पवार यांना अप्रत्यक्षपणं निवृत्तीचा सल्ला दिलाय. अजित पवार हे बंडखोरी करून सत्तेत सहभागी झाले आहेत. दुसरीकडं त्यांनी निवडणूक आयोगाकडं पत्र देऊन राष्ट्रवादीचं नाव व पक्षावर दावादेखील केला आहे.
हेही वाचा-