पुणे - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्था सांभाळणारी एसटी बस सेवाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'जनता कर्फ्यू' आवाहनाला प्रतिसाद देत बंद ठेवण्यात आली आहे. पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बससेवा ही प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणे येण्याचे टाळावे, असे आवाहन केल्यानंतर बसस्थानकात गर्दी होऊ नये, यासाठी आज एसटी महामंडळाच्या वतीने राजगुरुनगर आगाराच्या मार्फत चालणारी एसटी बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही एसटी व्यवस्थापनाला सहकार्य करून बाहेर पडू नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन आगार व्यवस्थापक रमेश हांडे यांनी केले आहे.
नागरिकांचा जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद असल्याने बसस्थानके मोकळी पाहायला मिळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या असून यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.