पुणे : बहुचर्चित महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही यंदा डिसेंबर महिन्यात अहमदनगर येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आमदार संग्राम जगताप आयोजक असणार आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा - डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्याची शक्यता असून तारखा लवकरच जाहीर होणार आहे. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने निवडणूक घेऊन खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती तयार करण्यात आली. त्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात पुण्यात कुस्ती स्पर्धांना आयोजित करण्यासाठी बाळासाहेब लांडगे आणि रामदास तडस या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची घोषणा - दरम्यान, न्यायालयाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीच्या निर्णयावर स्थगितीचा निकाल दिला. यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले होते. आणि आज बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.