पुणे : राज्याचा सरासरी पाऊस 314.3 मिमी असून आतापर्यंत 227.3 मिमी पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी 46.7 मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामात 142 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी एकूण ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच कापूस, सोयाबीन, तूर पिकांची पेरणी झाली आहे. भात लावण्याचे काम सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येईल.
1 रुपयात पीक विमा योजना : राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी पावती, टॅग ठेवावेत. कृषी योजनांची माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. राज्य सरकारने चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा याजना पोर्टलवर शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी राज्यातील 9 निवडक विमा कंपन्यांमार्फत सुरू असल्याची माहिती देखील चव्हाण यांनी दिली आहे.
पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलै : विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. तसेच पीक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला अर्जाची रक्कम रु. 40 दिली जाते. या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम भरू नये, अशी माहिती सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत, बाजार समिती येथे प्रदर्शित करावी. 1 रुपया व्यतिरिक्त रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आल्यास सामूहिक सेवा केंद्र चालकांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करुन कृषी विभागाला अहवाल पाठवावा असे, आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता : राज्यात पुढील दोन-तीन दिवस संमिश्र वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणी, शेतीची कामे ठप्प झाली आहेत.