मुंबई : ऑपरेशन लोटस मिशन राबवणाऱ्या भाजपला राज्यात हदरा देण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात वज्रमुठ सभा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. येत्या १४ मेला पुण्यात सभा होणार आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ही सभा पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील सभेचा मुहूर्त चुकणार असल्याचे बोलले जाते.
सभा पुढे ढकलण्यात येणार : महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वी झाल्यानंतर दुसरी सभा नागपूरमध्ये घेण्यात आली. तिसरी सभा मुंबईत १ मे रोजी वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स होणार आहे. आघाडीतील अनेक नेत्यांवर याची जबाबदारी सोपवली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सभेनंतर पुण्यात १४ मे ला आयोजित केली आहे. मात्र, ही सभा पुढे ढकलण्यात येणार असून मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात आयोजन केले जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे. सभा पुढे ढकलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अजित पवारांचे पुण्यात प्राबल्य : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची नाराजी, भाजपबाबत मवाळ भूमिका आघाडीची चिंता वाढवणारी आहे. शरद पवार यांनी देखील अजित पवारांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांनी ही राष्ट्रवादीत राहणार असल्याचा खुलासा केला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. पुण्यात अजित पवार यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही सभा पुढे ढकलली जात असल्याचे सांगण्यात येते.
ऑपरेशन लोटसला ब्रेक लावणार : देशभरात ऑपरेशन लोटस राबवून सत्तेतील सरकार पाडून तिथे भाजपचे सरकार बनवण्याचा घाट सुरू आहे. महाराष्ट्रात देखील भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांना गळाला लावत महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लावला. त्यामुळे आघाडीने भाजपला शह आणि ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी वज्रमुठ सभांचे आयोजन केले आहे. वज्रमूठ अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाला घेरण्यासाठी रणनीती आखली आहे.