पुणे - देशात दिवसेंदिवस डिझेल-पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत. मात्र, आता हेच दर शंभरीही पार करुन गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. पवार हे गुरुवारी खेड तालुक्यातील चिंबळी येथे एका खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 15 वर्षात वाहन स्क्रॅप होणार अस जाहीर केले आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ होत असताना आता हे नवीन नियमांचे संकट आले असून लोकांनी हेही संकट लक्षात ठेवावे, असे म्हणत अजित पवार यांनी या परीवहन नियमावरही नाराजी व्यक्त केली आहे.
भेसळीच्या भीतीने पेट्रोल पंप चालवायला दिले -पवार
पूर्वी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती. तर काही ठिकाणी चिप बसवून पेट्रोल-डिझेल कमी दिले जाते, अशा प्रकारची लूट ज्या पंपांवर होते ते लोकांच्या लक्षात आले. आता त्या पंपाकडे कोणी फिरकत नाही, असे सागंताना अजित पवार म्हणाले की, माझेही पंप आहेत. पण ते पेट्रोल-डिझेलचे पंप चालवायला दिले. कारण तिथं जर भेसळ झाली तर लोक म्हणायचे अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतोय. पण आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर पेट्रोल पंपांवर लक्ष ठेवून असते. त्यामुळे भेसळीच्या घटनांवर अंकुश बसला असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.