पुणे - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरले आहे. धरणाच्या पायऱ्यांवर पाणी ओसंडून वाहते आहे. तसेच, धरणाच्या आजूबाजूला पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
मागील ४ ते ५ दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तलाव, धबधबे आणि धरण ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटकांचीही गर्दी फुलू लागली आहे. लोणावळ्याचा परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे. तर, निसर्गाच्या या सौंदर्याने येथील डोंगर दऱ्याही नटल्या आहेत. पुणे, मुंबईसह राज्यातील पर्यटकांचे आवडीचे आणि आकर्षित करणारे धरण म्हणून भुशी डॅमकडे पाहिले जाते.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हे भुशी धरण परिसरात कुटुंबासह मौज मजा करण्यासाठी आले होते. बहुतांश तरुण आणि तरुणी याठिकाणी पाहायला मिळतात. एकमेकांच्या हातात हात घालून लोणावळ्याच्या दिशेने येणारे कपल देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु, लोणावळा पोलिसांच विशेष लक्ष नसल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. काही टवाळखोर पर्यटक थेट भुशी धरणाच्या पायऱ्यांवर तरुणींच्या आणि लहान मुलांच्या समोरच दारू प्यायल्याच दिसले. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांचा धाक नाही. तर, काही पर्यटक सेल्फी आणि फोटोच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. हे सर्व पाहता लोणावळा पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील डोंगरांमधून उंचावरून कोसळणाऱ्या धब-धब्यांखाली भिजण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी घेतला. अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यात बहुतांश पर्यटक हे पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुबंई येथून आलेले होते.