पुणे - लोणावळा शहर पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगारास खंडाळा येथील घनदाट जंगलात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर पुणे शहर परिसरात 70 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले आहे. बिभीषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप(42) रा. मंगळवार पेठ पुणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी खंडाळा जि.पुणे ता.मावळ येथे एक बंगल्यावर आरोपी बाब्याने दरोडा टाकून साहित्य आणि किंमती ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. संबंधित आरोपी हा नागफणी डोंगर, खंडाळा येथील वाघजरीच्या घनदाट जंगलात लपला असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वैभव सुरवसे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, अजीज मेस्त्री, मनोज मोरे यांनी घनदाट जंगलात, वरतून धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसात दोन तास पाऊलवाट काढत वाघजरीच्या जंगलातील एका डोंगराच्या कपारीत लपून बसलेल्या बाब्या जगतापला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी लोणावळा पोलिसांचे विषश कौतुक होत आहे.