बारामती - वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ५ मे ते ११ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने आज मध्यरात्रीपासून १८ मे पर्यंत बारामतीत पुन्हा टाळेबंदी असणार आहे. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
हेही वाचा - बारामती : अंत्यसंस्काराची केली तयारी अन् आजींनी चक्क उघडले डोळे
या वाढीव टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. मात्र, दूध विक्रीला सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तर, किराणा दुकानातून सकाळी सात ते अकरापर्यंत होम डिलिव्हरी चालू राहणार आहे. यासाठी ज्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या मदतीने स्वयंसेवक नेमावेत, तसेच मागील आठ दिवसांत टाळेबंदीत नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्ण वाढीचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढील सात दिवस वाढवलेल्या टाळेबंदीलाही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी केले.
हेही वाचा - पुणे - 'भारत बायोटेक'च्या प्लान्टसाठी तातडीने जागा देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार