पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सोमवारपासून करायचा की मंगळवारपासून हा निर्णय अद्याप व्हायचा आहे. सध्या हा निर्णय अधिकाऱ्यांवर सोडण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांमुळे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यात 13 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर लॉकडाऊन लागू केला तर तो लोकांसाठी 14 तारखेपासून लागू होईल. मात्र, 13 तारखेपासून लॉकडाऊन म्हटलं तर तो सोमवारी सकाळपासून लागू होणार असा अर्थ होतो. त्यामुळे, लोकांना काही गोष्टी खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला. दरम्यान, अजित पवार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमधे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.