पुणे - जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भिमाशंकर भोरगिरी परिसरात काजव्यांची चमचम सुरू झाली आहे. दरवर्षी याठिकाणी हजारो पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनामुळे पर्यटकांसाठी काजवा महोत्सव आयोजित केला नाही. त्यामुळे रोजगार मिळत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
हिरवागार निसर्ग, अंधार आणि याच अंधारात भिमाशंकर भोरगिरी अभारण्यात काजव्यांचे लखलखते तेज जणू निसर्गाचे रुपच बदलून टाकते. भिमाशंकर भोरगिरी अभारण्याचा हिरवागार नजारा दिवसा मनप्रसन्न करत आहे, तर रात्रीच्या वेळी कांजव्यांच्या चमचमत्या लखलखाटात संपूर्ण अभारण्य लखाखून निघत आहे. काळ्याकुट्ट अंधारात जंगलात वेगवेगळे आवाज येतात. त्यात अंधारात लखलखता काजवा हिरव्यागार जंगलाला सोनेरी रूप देत आहे. हा नजारा डोळे दिपवून मन प्रसन्न करणारा आहे. विशेष म्हणजे हा काजवा फक्त १५ दिवसच जगतो. पाऊस पडल्यानंतर काजवा दिसत नाही. या निसर्गाचे अंधारातील देखणं रूप पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. त्यांच्यासाठी खास काजवा महोत्सव आयोजित केला जातो. मात्र, यंदा या महोत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे यंदा पर्यटक याचा आनंद घेऊ शकणार नाही. तसेच या पर्यटकांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतात. काजव्यांचा लखलखाट तर वाढलाय मात्र हा निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी पर्यटक नसल्याने अनेकांच्या घरची चूल मात्र विझली, असेच चित्र भिमाशंकर परिसरात पाहायला मिळत आहे.