बारामती - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बारामतीमध्ये शुक्रवारी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ही दारू गोवा बनावटीची असून, खताच्या ट्रकमध्ये हा दारूसाठा लपवण्यात आला होता. ही ट्रक जप्त करण्यात आली असून, एकूण 56 लाख 48 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालकासह तीन आरोपींना अटक केली आहे.
आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
ट्रकचालकासह तीन आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार बारामती तालुक्यात तीन ठिकाणी सापळा लावण्यात आला. संबंधित ट्रक फलटणमार्गे सांगवीकडून बारामतीच्या दिशेने जात होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. या ट्रकला थांबवून ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये असलेल्या खतात दारू साठा आढळून आला. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ७१० बाॅक्स तर बिअरच्या बाटल्यांचे १९० बाॅक्स मिळून आले. पोलिसांनी या 44 लाख 48 हजारांच्या दारूसाठ्यासह ट्रक जप्त केला आहे.