बारामती (पुणे) - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देत खून करणाऱ्या पतीला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर.आर.राठी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पतीला 10 हजार रुपये दंडही करण्यात आला. श्यामराव लालासो जगताप (रा.जळगाव सुपे,ता. बारामती) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
काय घडली होती घटना
अधिक माहितीनुसार 16 ऑक्टोबर, 2014 रोजी ही घटना घडली होती. शामराव याने दारू पिऊन येत त्याची दुसरी पत्नी सुनीता हिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली. त्यानंतर घरातील रॉकेलचा डबा तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले होते. घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी पोलिसांनी तिचा जबाब घेत तक्रार दाखल केली होती. मृत्यूनंतर शामराव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक एस.पी. गायकवाड यांनी करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात न्यायाधीश राठी यांनी श्यामराव जगताप यांस दोषी धरत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हेही वाचा - अखेर बंटी-बबली नागपुरात गजाआड! तब्बल १९ गुन्हे उघडकीस