बारामती - राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी योग्य उपाययोजना संदर्भात चर्चा होणार आहे. व या चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बारामतीमध्ये वाढत असलेल्या कोरोनाबाधितांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान बारामतीत वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले आहेत, त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही
कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही, मात्र तरी देखील खासगी रुग्णालयांमध्ये इंजेक्शन कमी पडत आहेत, त्याची कारणे वेगळी आहेत असेही पवार यावेळी म्हणाले.
प्रत्येकासाठी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच या बैठकिमध्ये सोमवारपासून दुकाने उघडू द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत देखील चर्चा होईल. याबाबत आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल.
हेही वाचा - राज्यात लसच नाही तर लसीकरण महोत्सव कसा करणार?