पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच सह्याद्रीच्या कुशीत असणारे चासकमान जलाशय कोरडेठाक पडले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठा अद्यापही ५० टक्क्यांच्या आतच आहे. तरीही धरणाच्या डाव्या कालव्यातून 550 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मोठ्या दुष्काळी संकटात असणाऱ्या शिरूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण जास्त राहिले आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी जलसंपदा मंत्र्यांनी चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजपासून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
चासकमान जलाशयातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी खेड व शिरूर तालुक्याला पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, पाण्याचे नियोजन होण्याआधीच सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये पाणीटंचाईचे संकट न पाहताच हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मागील आठ दिवसापासून धरण परिसरामध्ये पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याने पुढील काळामध्ये पावसाचा जोर वाढला तरच धरण पातळीतील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.