पुणे - आंबेगाव तालुक्यातील साकोरी गावात पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वनविभाग आणि बिबट निवारा केंद्राच्या पथकाने १२ तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
श्रुतिका महेंद्र थिटे (रा. जऊळके, ता. खेड ) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर साकोरी परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभाग आणि बिबट निवारा केंद्र माणिकडोह यांच्या मदतीने रविवारी रात्रीच्या सुमारास साकोरे येथे पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास हा नरभक्षक बिबटा जेरबंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास घेतलाय.
सध्या ऊस तोडणी झाल्याने संपूर्ण परिसर मोकळा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिबट्याचा निवारा संपल्याने बिबट लोकवस्तीत फिरून पाळीव प्राण्यासह माणसांवर हल्ले करत आहेत. त्यात रविवारी एका चिमुकल्या मुलीला बिबटने भक्षक बनविले. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन, असे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.