पुणे - नगर-कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने एक बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार व परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. महामार्गालगत असणाऱ्या लोकवस्तीत शिकारीच्या शोधात बिबट्या भटकंती करत असताना अनेक वेळा बिबट्याच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
नगर-कल्याण महामार्गावर अनेक ठिकाणी बिबट्याच्या वास्तव्याचे फलक लावण्यात आले असून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या फलकाकडे वाहनचालक दुर्लक्ष करत असुन भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे बिबट्याच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.