पुणे - नगर-कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार गावात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा गंभीर अपघात झाला होता. मात्र, या अपघातानंतर माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र यांच्या मदतीने जखमी बिबट्यावर उपचार करण्यात आले. आता दोन दिवसांनंतर त्या बिबट्याची प्रकृती स्थिर असल्याचे डाक्टर अजय देशमुख यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबरला पिंपरी पेंढार गावालगत नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याचा अपघात झाला होता. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला पायाला आणि कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. त्या वेळी घटनास्थळी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राची टीम पोहोचली आणि बिबट्याला बेशुद्ध करून निवारा केंद्रात घेऊन गेले. त्यानंतर बिबट्यावर उपचार करण्यात आले. या उपचारांना बिबट्याने चांगली साथ दिली. त्यामुळे या गंभीर अपघातातून हा बिबट्या वाचला आहे.
मागील अनेक दिवसांपासून महामार्गालगत बिबट्यांचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने आणि होणारी वाढती वाहतूक लक्षात घेता बिबट्यांच्या अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. नगर-कल्याण महामार्गावर आणि ठिकाणी बिबट्याचा अपघाताबाबत फलक लावण्यात आलेले आहे. मात्र, वाहन चालक चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याचे अपघात वाढत आहेत.