जुन्नर (पुणे) Leopard Attack On Baby : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडी करगळ यांचा मेंढपाळचा वाडा बसलेला होता. त्यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्यांचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. त्याच वेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जाग आली. बिबट्या मुलाला ओढत असताना सोनल यांनी बघितले. त्यावेळी तिने एका हाताने मुलाला ओढत बिबट्याचा प्रतिकार सुरू केला. तिने एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनी जोर जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्या पळून गेला.
बिबट्याच्या हल्ल्याच्या जखमा : या हल्ल्यात सात महिन्यांचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी सागर विश्वासराव, प्रकाश फुटाणे यांनी मेंढपाळ कुटुंबाला धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पहाटे घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.
बिबट्याचे हल्ले वाढले : जुन्नर आणि आंबेगाव परिसरात बिबट्टयांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेक वर्षांपासून बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून अनेकांवर बिबट्याने हल्ले देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करून पुन्हा जुन्नर आणि आंबेगाव मधील जंगलात सोडून दिले जात असल्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. त्याचबरोबर दिवसा-ढवळ्या बिबट्या गाव वस्तीत शिरत असल्याचं चित्र आहे.
हेही वाचा: