पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून इच्छुकांकडून मोर्चे बांधनीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या जागेसाठी दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार तयारी केली आहे. तसेच भाजपकडून देखील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. अशातच दिव्यंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देखील आपली इच्छा व्यक्त करत पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.
निवडणूक बिनविरोध : आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पण उमेदवारी कुणाला द्यायची ? हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगले काम केले आहे. मुक्त टिळकांचे मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच आमची इच्छा असून पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक लढणार असल्याचे यावेळी टिळक यांनी सांगितले आहे. तसेच मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेले आहे. तसेच माझा मुलगा कुणाल देखील चांगले काम करत आहे. त्यामुळे आम्हालाच उमेदवारी मिळावी, असे देखील यावेळी शैलेश टिळक यांनी सांगितले आहे.
पोटनिवडणुक जाहीर : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर केंद्रीय निवडणुक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
मोर्चे बांधणीला सुरुवात : पुण्यातील कसबा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील इच्छुक उमेदवारांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कसबा मतदार संघातून काँग्रेस निवडणूक लढवत असल्याने आता झालेल्या महाविकास आघाडीमुळे काय निर्णय घेतला जाते आहे. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि मनसेकडून अजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. आत्ता कसब्यातील जागा ही राष्ट्रवादीकडे जाणार की काँग्रेसकडे, हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील, माजी नगरसेवक दीपक मानकर तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे रवींद्र धंगेकर हे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बिडकर हे देखील इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Chinchwad Kasba Assembly Election - चिंचवड-कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर