पुणे : कसबा पोटनिवडणूकीत टिळक कुटुंबामध्ये भाजपा तिकीट देईल, असे सर्वांना वाटले होते. भाजपाने मात्र उमेदवारी हेमंत रासनेंना दिल्याने ब्राह्मण समाज आणि टिळक कुटुंब नाराज असल्याचे समोर आले होते. आज मतदानाच्या दिवशी मात्र कुटुंबातील सर्व सदस्य शैलेश टिळक, कुणाल टिळक, त्यांची मुलगी आणि त्यांच्या सुनबाई यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज मतदान करताना मात्र मुक्ताताई टिळक यांची आठवण येत आहे. प्रत्येक वेळेस त्यांची आठवण राहणार, असल्याच्या भावना यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.
मुक्ता टिळक यांची आठवण : दरवेळेस आई म्हणजेच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यासोबत मतदान करायला येत होतो. त्यांच्याशिवाय हे पहिलेच मतदान करावे लागत आहे. याचे खूप दुःख असल्याची भावना कुणाल टिळक यांनी व्यक्त केली आहे. तीच भावना शैलेश टिळक यांनीही व्यक्ता केली आहे. प्रत्येक वेळी पत्नी मुक्ता टिळक यांची आठवण येतच असते, शब्दात ते सांगता येत नाही. असे सुद्धा शैलेश टिळक म्हणाले.
टिळक कुटुंबीय प्रचारामध्ये सहभागी : खरंतर टिळक कुटुंबीयांमध्ये भाजपाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या सक्रिय सहभाग किती असेल? अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु अगदी शेवटच्या चार ते पाच दिवसांमध्ये टिळक कुटुंबातील सर्वच सदस्य भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये ते सहभागी होते. उपमुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये होते. त्यामुळे कुटुंबीयांची नाराजी भाजपाकडून दूर करण्याची जो प्रयत्न केला जात होता, त्याला यश आले होते.
भाजपाचा उमेदवार निवडून येणार : सुरुवातीची मतदानाची टक्केवारी जर पाहिली, तर भाजपाचा उमेदवार हा प्रचंड मताने निवडून येईल, असा विश्वास कुणाल टिळक आणि शैलेश टिळक या दोघांनी व्यक्त केलेला आहे. कसब्याचा मतदार हा विचाराने मतदान करणार आहे. भाजपाने काय केले, हे इथल्या मतदारांना माहित आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून म्हणजेच रवींद्र धंगेकर उपोषणाला बसले. आपण पराभूत होते हे दिसल्यानंतर काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रकार होता. त्यानी काही फरक पडणार नाही. हेमंत रासने प्रचंड मताने निवडून येतील, असा विश्वास टिळक कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. सकाळी 11 पर्यंत कसबा 8.25 टक्के तर, चिंचवड मतदारसंघात 10.45 टक्के मतदान झाले होते.