पुणे - बारामती शहरातील प्रशासकीय भवन येथे मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य बारामती शहर आणि तालुका यांच्यावतीने शनिवार एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनातर्फे राज्यभर एक दिवसीय आंदोलन छेडले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतही आंदोलन झाले.
हेही वाचा - शिरूर तालुक्यातील राऊतवाडीत मेढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला
अनुसुचित जातीमध्ये आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. प्रमाणे वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, तसेच संसद भवन आणि विधानभवन या 'ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे आणि आण्णा भाऊ साठे यांचे पुतळे बसवण्यात यावेत. या प्रमुख मागण्यांसह संगमवाडी पूणे येथील लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे. साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागु करण्यात याव्यात.
हेही वाचा - पुण्यात टिकटॉक वरुन साकारला 'आळंदी पॅटर्न'; 6 जणांना अटक
तसेच मातंग समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्यात यावा, आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची सर्व कर्ज माफ करून नव्याने त्वरीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, बारामतीत साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - ... म्हणून ससून रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मिळाली राख
यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र भिसे, बारामती शहराध्यक्ष अतुल गायकवाड, निलेश जाधव, अमोल इंगळे, अमोल भिसे, सचिन माने, यांसह आंदोलक उपस्थित होते.