पुणे: या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद भाजपच्या चित्रा वाघ यांनी घेतली असून या प्रकरणातील दोषी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
हॉर्नवरून उद्भवला वाद: गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षा यांनी त्यांच्या साथीदारासह भर रस्त्यात या तरुणीचा विनयभंग केला. पुण्यातील एस बी रोडवर काल रात्री पावणे ९ वाजता ही घटना घडली. या प्रकरणात तरुणीला शिवीगाळ तसेच मारहाण केल्यामुळे जखमा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. पीडित तरुणी ही स्वतः एक वकील असून त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.
मोटार बाजूला थांबवून वाद घातला: इरकल हे शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात राहायला आहेत. सोमवारी (१३ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास वकील तरुणी दुचाकीवरुन पूना हाॅस्पिटलकडे निघाली हाेती. त्या वेळी इरकल, त्यांची पत्नी तसेच एक महिला आणि पुरुष असे चौघे जण माेटारीतून निघाले होते. पत्रकार नगर येथे तरुणीने हाॅर्न वाजविल्याने इरकल आणि मोटारीतील तिघे जण चिडले. त्यांनी मोटार बाजूला थांबवून वाद घालण्यास सुरुवात केली. इरकल यांनी अश्लील वर्तन करून तरुणीचा विनयभंग केला. इरकल यांची पत्नी संध्याने चपलेेने मारहाण केली तसेच मोटारीतील एक महिला आणि एका व्यक्तीने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली, असे तक्रारदार तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
कोयता गॅंगची महिलेला मारहाण: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी परिसरात फक्त 'गाडी हळू चालवा', असे सांगितल्याने काही सराईतांनी हातात कोयते आणि तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी संबंधित महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये चित्रित झाला आहे. 16 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
महिलांना शिविगाळ: नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी गावात रविवारी सायंकाळी स्थानिक महिला आपल्या घरासमोर बसली होती आणि त्यांची लहान मुले बाहेर खेळत होती. त्याचवेळेस दुचाकीवरून काही तरुण वेगाने गाडी पळवत ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवण्याची विनंती केली. त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवेली पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
हेही वाचा: Satara Crime : डाळीबांच्या शेतातून १ कोटीचा गांजा जप्त, शेत मालकास अटक