पुणे - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगारांनी आपल्यावर होत असलेले अन्यायावर चिंता व्यक्त केली. प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे ते आत्महत्येला प्रवृत्त होत असल्याचा आरोप कामगार नेते मारुती भापकर यांनी केला.
कामगारांना कामावरून काढल्यानंतर कामगाराचे कुटुंब मोठ्या संकटात सापडते. त्याचे कुटूंब महागाईच्या काळात बेघर होते. अशावेळी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. याचा कंपनी व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. कामगारांवरील अन्याय रोखण्यासाठी कामगारांनी एक होण्याची गरज आहे, अशी आवाहन कामगार नेते मारुती भापकर यांनी यावेळी केले.
सध्याच्या मोठ्या प्रमाणात कामगारांचे शोषण होत असून हे भाजप सरकार हे भांडवलदार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करत आहे. पुर्वी शेतकरी आत्महत्या करत होते. आता कामगार आत्महत्या करायला लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच कामगारांवरील होणारे अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा तुम्हालाही सत्तेवरुन पायउतार व्हावे लागणार असल्याची टीका भापकर यांनी केली.