पुणे : पुण्यातील येरवडा येथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात या सातही विधीसंघर्ष बालकांना काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री 11 ते 12 च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधीसंघर्षित बालक पळवून गेले आहेत. सुधारगृह तोडून खतरनाक विधीसंघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ आहे.
कोयता टोळीची मोठी दहशत : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता टोळीने मोठी दहशत माजवली आहे. पोलीस सातत्याने कोयता टोळीवर कारवाई करत असताना पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारक सुधारगृहामध्ये सात विधीसंघर्ष बालक पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे सातही विधीसंघर्ष बालक कोयता टोळीचे सदस्य असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा कोयता टोळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिडी लावून पलायन केले : याबाबत अधिकृत माहिती सुधारगृहाच्या प्रशासनकडून देण्यात आली नाही. तरी हे सातजण रात्री पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. शिडी लावून बालगृहाच्या खिडकीमधून यांनी पलायन केले आहे. पोलिसांपुढे आता मोठा आव्हान उभे राहिलेला आहे की, यांना पकडणे ही प्राथमिकता आहे. कारण हे विधीसंघर्ष बालक असले तरी ते कोयता गँगचे सदस्य असल्याची माहिती आहे.
शंभरहून अधिक कोयते जप्त: या आधी पुण्यात अनेक गुन्हे घडले होते. गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर होताना दिसून येत आहे. 12 मे 2019 रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी तिघांवर कोयत्याने वार केले होते. या घटनेत एका महिलेसह तिघे गंभीर जखमी झाले होते. पुण्यातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या होत्या. गुन्हेगारी कारवायांमध्ये कोयत्यांचा होणारा सर्रास वापर पाहून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील जुना बाजार परिसरातून शंभरहून अधिक कोयते जप्त केले होते.
हडपसर परिसरात कोयता गँग सक्रिय: तसेच पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग सक्रिय होत आहे. या गँगने परिसरात दहशत निर्माण केली होती. या गँग विरोधात कारवाई करण्यासाठी थेट खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. हडपसर परिसरात कोयता गँग सक्रिय होत असून परिसरात तोडफोड, गाड्यांची तोडफोड, मार्केटमध्ये दहशत निर्माण करणे असे काम ही गँग करत होती.