पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यातिथी आणि हुतात्मा दिनानिमीत्त कोथरुड येथील 'गांधी भवन'मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद (सीएए) व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) विरोधात अहिंसात्मक जनआंदोलन कार्यक्रम सुरु होता. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने घोषणाबाजी आणि गोंधळ घातल्याने 37 कार्यकर्त्यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. व्यासपीठावर 'युवक क्रांती दला'चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, धर्मगुरू बिशप डाबरे उपस्थित होते.
हेही वाचा - गांधीजींना गोळी घालणारी व्यक्ती हिंदू - उर्मिला मातोंडकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा संघटक अण्णासाहेब देवकर यांनी 30 ते 40 साथीदारांसह कोणतीही पूर्व परवानगी न घेता गांधीभवन येथील सार्वजनीक रस्त्यावर बेकायदेशीरपणे एकत्र जमाव केला होता. तेथे 'वी सपोर्ट सीएए आणि एनआरसी' तसेच 'जय भवानी जय शिवाजी' आणि 'देश के गद्दारो को, गोली मारो सालोको', 'वंदे मातरम्' यासारख्या घोषणा देत आंदोलन केले अशा घोषणा दिल्या. पोलीस सहआयुक्तांनी जमावबंदी तसेच मनाई आदेश लागू केला असतानाही आरोपींनी त्याचा भंग केला. सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी काल (गुरुवारी) सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही पाटील या करित आहेत.
अटक केलेल्यांची नावे -
हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा संघटक संतोष उर्फ अण्णासाहेब किसन देवकर (वय 30, रा. फुरसुंगी), सुरज सुरेश महतो (वय २२, रा. सातारा), मयुर शांताराम गाडे (वय 29, रा.भोर), सागर पांडुरंग गाळे (वय 29, रा. कापूरहोळ, ता. भोर) प्रशांत सुरेश रेवडीकर (वय 37 रा. खंडाळा, जि. सातारा) यांच्यासह एकुण 37 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.