पिंपरी-चिंचवड Korean Molestation Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात दक्षिण कोरियातील एका तरुणीची छेड काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी छेड काढणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी केली होती. आता या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंड विरोधी पथकानं रावेत येथून एकाला अटक केली आहे. भरत हुणुसंले असं या आरोपीचं नाव आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : गुंड विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरियन तरुणीची छेड काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची शहानिशा करून, पथकानं रावेत फिश मार्केटमधून व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाला अटक केली. आरोपी हा मूळचा कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो रावेत येथे कामानिमित्त राहत होता.
कोरियन तरुणीची छेड काढल्याप्रकरणी व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मूळचा कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील असलेला हा आरोपी कामानिमित्त रावेत येथे राहत होता. - सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने
काय आहे प्रकरण : या कोरियन तरुणीचे युट्युबवर १.६८ लाख सबस्क्राइबर्स आहेत. दिवाळीच्या काळात ती पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर फेरफटका मारत होती. युट्युब व्हिडिओ बनवण्यासाठी ती परिसरातील दुकानदारांशी संवाद साधत होती. दरम्यान, तिचा व्हिडिओ सुरू असताना एका तरुणानं थेट तिच्या गळ्यात हात टाकत तिची छेड काढली. कोरियन तरुणी आपला व्हिडिओ शूट करत असताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.
गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न : पिंपरी-चिंचवडमधील एका मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या आरोपीनं कोरियन तरुणीच्या गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. "इतके लांब उभे राहू नका. असंच धरून ठेवा," असं तो त्या तरुणीला म्हणत होता. यानंतर त्या तरुणीनं स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला असता, तो तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं घडत असताना ही तरुणी अस्वस्थ असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
तरुणीनं व्हिडिओद्वारे प्रकार समोर आणला : या घटनेनंतर ही तरुणी लगेच तेथून निघून जाते. "मला येथून पळावं लागेल", असं ती व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते आहे. दक्षिण कोरियाच्या या तरुणीनं युट्युबवर २३ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे तिनं हा सगळा प्रकार समोर आणला. घडलेला हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असून, पोलिसांनी या तरुणावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होते आहे.
हे वाचलंत का :