पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) मुलांच्या वसतिगृहाजवळ एक मोठा किंग कोब्रा आढळल्याने खळबळ उडाली. मुलांच्या ९ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या केबिनमध्ये हा नाग होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
कोब्राला पकडून सोडले जंगलात -
सध्या वसतिगृहात मुले नाहीत मात्र, हा सहा फुटी नाग पाहून या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला याबाबत माहिती कळवली. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक सुनील माळी हे सर्प मित्र आहेत. त्यांनी तातडीने वसतिगृहाकडे धाव घेत किंग कोब्राला शिताफीने पकडले.
माळी यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.
साडेचार किलोचा होता कोब्रा -
विद्यापीठात पकडेला नाग हा किंग कोब्रा असून त्याची लांबी सहा फूट होती. त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते, अशी माहिती माळी यांनी दिली. सुनील माळी यांनी आतापर्यंत २०० हून अधिक साप व नाग पकडले आहेत. माळी यांनी दाखवलेल्या धाडसाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह सर्वांनी कौतुक केले.